Tuesday, 1 September 2020

पुनश्च:हरिओम..पर्यटन श्रीगणेशा.

 पुनश्च:हरिओम..पर्यटन श्रीगणेशा.

©️राहुल जोगळेकर

पोस्ट नावासहित पुढे पाठवावी.


नमस्कार पर्यटकहो, 


  खूप दिवसांनी नाही महिन्यांनी आपल्याशी या माध्यमातून संवाद साधण्याचा योग येतो आहे. सगळेजण कसे आहात? तब्येतीची काळजी घेत असालच , असणार आणि घ्यायलाच हवी.. 

आज आपण सगळेच जण कोरोना महामारीच्या विळख्यात आहोत. गेले ५-६ महिने ह्या साथीच्या रोगाने सर्व जगावर भयानक संकट आले आहे. प्रत्येक देश प्रत्येक राज्य त्यासाठी हरतह्येने हरप्रकारे उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. 


आपल्या सर्वांना कल्पना आहे ह्या रोगाच्या प्रसारामुळे सर्व जनजीवन हे ४-५ महिने पुर्णपणे ठप्प होते, आता काही अंशी त्यामध्ये थोडी शिथिलता आली आहे त्यामुळे काही उद्योगधंदे, व्यवहार हळूहळू सुरूवात होत आहेत. त्यामुळे दिवसागणिक परिस्थिती सुधारेल असा विश्वास आहे आणि अर्थचक्राची गती वाढण्याच्या कामी यामुळे नक्कीच मदत होणार आहे. 


शासनाकडून शेतीपासून इतर अनेक उद्योगधंद्याना काही सरकारी मदतीची घोषणा होते आहे किंवा काही लघुउद्योगांना काही कर्जमाफी अथवा नवीन कर्जाच्या घोषणा होत आहेत हे सुध्दा एक प्रकारे उद्योगधंद्याना चालना देण्याचे प्रयत्न आहेत. 


     या सगळ्यांमधे आमच्या सारख्या पर्यटन व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारे मदत सरकार कडून मिळत नाही. तशी आमची अपेक्षा पण नाही. अशा परिस्थिती मध्ये पर्यटन व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे कारण सर्वात प्रथम तडाखा बसलेला अन् सर्वात शेवटी उभारी  घेणारा हा "पर्यटन"व्यवसाय आहे. कारण प्रत्येक जण पर्यटन हे मजा, मौजमस्ती किंवा विंरगुळा म्हणून करतो. हे ठिक आहे पण आता काही काळापूरते घरात बसणे जरूरी आहे. तुम्हाला तरी आवडेल का? इतके दिवस डांबून ठेवल्यासारखे वाटते आहे नां? मला माहित आहे की तुम्ही सगळेच कोरोनाचा धोका टळला, परवानगी मिळाली की पर्यटन साठी खूप उत्सुक आहात.

या मध्ये नक्कीच फरक पडतो आहे..E pass ची अट रद्द झाली आहे..हॉटेल्स, लॉज १००% चालू करायला परवानगी मिळाली आहे. बस, मिनी बस या सुद्धा सुरू करायला परवानगी आहे..तेव्हा सगळ्या गोष्टींची पूर्तता करून योग्य ती काळजी घेऊन आपण पर्यटन सुरू करीत आहोत.आपले सहकार्य अपेक्षित आहे..


कारण पर्यटन केल्याने आपल्या मनाला येणारी मरगळ ही नक्कीच दूर होणार आहे. आज अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत.. त्यानंतर आरोग्य शिक्षण महत्वाचे आहे.. त्यानंतर पर्यटन हे सुध्दा ताजेतवाने होण्यासाठी, परत एकदा आयुष्याची बॅटरी चार्ज करण्यासाठी गरजेचे आहे. 


ह्या कोरोनाशी लढताना पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना हातात हात घालून काम करायचे आहे.. सर्व बाबतीत अतिशय चोख सेवा देणारा पर्यटन व्यावसायिक आज कुठेतरी थांबला गेला आहे त्याला परत धावायला लावण्यासाठी आपल्या सारख्या सुजाण पर्यटकांच्या  छोट्याश्या पाठिंब्याची आवश्यकता आहे त्यासाठी पर्यटक आणि व्यावसायिक ह्या दोघांना एकत्र येऊन काम करायचे आहे, आपला सहभाग यामध्ये असेल अशी खात्री आहे म्हणून आपल्यापुढे हक्काने हा विषय मांडायचे धाडस केले आहे. 

आम्ही " पार्थ टॅॢव्हल्स " आपल्या साठी काही योजना आणणार आहोत त्यामध्ये निराश करणार नाही ह्याची खात्री आहे. 

एका वेगळ्या लेखासह आपल्यापुढे येईन तो पर्यंत आपली रजा घेतो.. माझा लेख शांतपणे वाचलात त्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार!! 

आपला विनित, 

राहुल जोगळेकर

पार्थ टॅॢव्हल्स, डोंबिवली

9819042956

9594939356


©️राहुल जोगळेकर

पोस्ट नावासहित पुढे पाठवावी.

Friday, 10 May 2013

मनाच्या कोपऱ्यातून...

सकाळपासूनच कामाची गडबड चालू झाली होती..स्वतःचे बघू की इतरांचे अशा द्विद्धा मनस्थितीत  होतो,
आवरण्याची गती एका मर्यादेपेक्षा काही वाढवता येणार नाही हेय लक्षत आले., शांतपणे इझी चेयर वर बसलो, जरा मागे टेकून लवंडले ना की आपोआप कशा जमवायच्या याची भट्टी जमते...
खूप गोंधळ उडाला असेल ना तर २ मिनिटे डोळे मिटून मनातल्या मनात कामाची उजळणी केली ना की मग हलके हलके वाटायला लागते..मनातल्या विचारांच्या आंदोलनाला एक दिशा मिळालेली असते, त्यांचे पुढे काम चालू राहते..
तरीसुद्धा काही गोष्टी पुन्हा पुन्हा वादळी वाऱ्यांच्या वेगासारखे येऊन मनातल्या अत: पटलावर येऊन थडकत असतात.त्यांना थोपवून धरण्यासाठी मेंदूची अतिरिक्त क्रयशक्ती नष्ट होते आहे याची मोजदादच नसते..

खरचं मेंदूचा असा गुंता झाला ना मग सगळेच बिनसते, सगळेच जणू बंद पुकारू लागतात, त्यांच्या मध्ये सुद्धा एक प्रकारची चढाओढ लागते. पण काही गोष्टीसाठी वेळ नसला तरी तो काढायचा असतो.स्वतःला बाजूला ठेऊन ..मग बघा यातून काय काय साध्य होते, परीक्षा कठीण असते पण आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही..
काही जण याला "आशा " म्हणतात तर काही "वेडेपणा" म्हणतात, एक पुसटशी रेषा ह्या दोघांमधून जाते पण नेहमीच्याला बरोबर कळते..असो
लिहीत बसलो तर वेळ आणि लिखाण यांचा मेळ घालणे जरा कठीण असते ..तेव्हा आज इतकेच पुरे ...

राहुल जोगळेकर ९८१९०४२९५६

Wednesday, 8 May 2013


पार्थ काश्मीर वैष्णोदेवी सहल 
२२ एप्रिल २०१३ ते ०१ मे २०१३



"पार्थ" प्रेमाने आपण "काश्मीर" ला आलात
प्रथम वैष्णोदेवी दर्शनाने तृप्त झालात,
पहलगामच्या हवेने थंड थंड झालात..
बेताब व्ह्यलीफिरताना नंदनवनात आलात..

श्रीनगरच्या मुघल गार्डनमध्ये मुलांसंगे बागडलात,
सोनमर्गच्या बर्फामध्ये स्लेज खेळताना रंगलात,
गुलमर्गच्या गंडोलात बसून शिखरांशी भिडलात,
सावंत, पाटील अन् घाणेकर तुम्ही "पार्थ"शी घट्ट जुड्लात

Tuesday, 7 May 2013

हलके फुलके..पण तरी थोडेसे गूढ...


हलके फुलके..पण तरी थोडेसे गूढ......


सुरुवातीपासून वेगळे वाटावे असे काही नव्हतेच..युगानुयुगे आपली ओळख आहे असे सतत वाटायचे..एकमेकांना जोखणे म्हणतात ना ते याच प्रकारातले.. पार्थ हा यातला एक मजबूत धागा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे..त्याच्या अस्तित्वाने ओघाने पुढे हे सगळे आहेच.,
खरतरं एक अनामिक कुतूहल पण आहे या सगळ्याबरोबर, काय हे सांगणे अवघडच आहे. पटकन सहजरीत्या समजावून सांगणे माझ्यासारख्याला जमणारे नाही.
अजून ओळख संपलेली नाही, अजून शिकतोच आहे,दरवेळी काहीतरी नवीन, गूढ, अंत:करणापासून ते मनाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत, छोट्या छोट्या कप्प्यामधून नाद अजून घुमतोच आहे.,आठवणींचा, वेदनेचा, संवेदनांचा..त्यात दरवेळी काहीतरी भरच पडते आहे..
स्वत्वाची ओळख ही प्रत्येकाला महत्वाची वाटते, त्यासाठी धडपड करणे हे अनिवार्य आहे, खूप उंच डोहात वरून उडी मारणे हे तसे धाडसाचे असते, पण प्रयत्नाची शिकस्त, दुर्दम्य इच्छाशक्ती, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, ह्यापुढे आव्हाने फिकी वाटतात..
बस, पुढे जायचे, मनाच्या आनंदासारखे दुसरे काही नाही..हे सगळे करत असताना समाधानाचा आरसा सतत समोर ठेवला की मग त्यात मध्ये मध्ये डोकाऊन बघता येते..आपण आपलीच पाठ थोपटून घ्यायला लाज कसली?
सगळे करत असताना मग किती त्रास, कष्ट, चिंता मध्ये आले तरी त्याचे काही वाटत नाही, शेवटी साध्य करणे हे महत्वाचे..साध्य करताना साथ असेल तर मग सोन्याहून पिवळे, अतीव समाधानाची एक लकेर चेहऱ्यावर नक्की दिसेल अन् त्या समाधानातून हुंकार भरून नवीन क्षितिजे गाठायला सोबतीने पुढे जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन जगणे..
आज इथेच थांबतो..
तुझाच,
राहुल

Monday, 6 May 2013

लिखाणाचा श्रीगणेशा ...पुन्हा नव्याने..


 



काश्मीर”’ भारताचे नंदनवन म्हणून संबोधतात त्याची प्रचिती यावेळी प्रकर्षाने जाणवली. दरवर्षी काहीतरी ठिकाण नव्याने सुरु करायचे हा पार्थ चा शिरस्ता आम्ही या वेळीही पाळला.
नाही म्हणता म्हणता मला इंजिनियरिंग क्षेत्रामधील नोकरी सोडून ६ वर्ष होऊन गेली यावर विश्वास बसत नव्हता. Paarth Travels ला पण १० वर्ष झाली..त्यामुळे पसारा हा वाढतच होता..त्यात एक पथ्य ठेवले ते म्हणजे जे आवडेल, भावेल तेच करायचे,..इच्छा नसताना, पैसे मिळतात म्हणून काहीही करायचे हे मनाला पटतच नव्हते..
मेहनत करण्याची तयारी, नवीन आव्हाने स्वीकारण्याची इच्छा होती, त्याला कल्पकतेची जोड व स्वतः सहल संचालन करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी... त्यामुळे काम करताना त्रास असा कधी जाणवलाच नाही, उलट प्रत्येक वेळी सगळ्यांचे सहकार्य, मदतीची इच्छा, तळमळ जाणवली आणि आम्ही अधिक जोमाने पुढे जाण्यास निघालो..
यश म्हणजे काय? हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो, व्यक्तीसापेक्ष यशाची व्याख्या बदलते, किती पैसा मिळवलात, किती गाड्या घोडे घेतले यामुळे जर यशाची फुटपट्टी ठरत असेल तर मग सगळेच कठीण होऊन बसेल..
माझ्या मते यश म्हणजे आपण करत असलेल्या कामामध्ये तन-मन-धन अर्पून आपले १००% त्यात ओतणे, त्यानंतर जो निकाल हाती येईल, ज्यामुळे पार्थ बरोबर येणारा पर्यटक समाधानी होईल, ती खरी कामाची पावती..एक चांगला माणूस म्हणून नावलौकिक मिळवायला तपश्चर्या करावी लागते. एखादे काम हाती घेतले असल्यास ते पार पडेपर्यंत उसंत घेता काम नये..
असो आज इतकेच बोलून थांबतो, नव्याने लिहिताना वाहते व्हायला थोडा अवधी लागायचा हे नक्की..


Monday, 2 April 2012

समर्थ ....एका संध्याकाळी

समर्थ दिसामासी मोठा होत होता..त्याचा १ वर्षाचा वाढदिवस जवळ येत होता..त्याच्या बाललीला बघून मनाला एक वेगळीच हुरहूर लागून राहते..किती सुंदर असतील ते बालपणीचे दिवस..असे वाटते..म्हणता म्हणता १ वर्षाचा कालावधी उलटून गेला पण..ह्या अन् अशा कितीतरी दिवा स्वप्नामध्ये मी ४ दिवस होतो..
  त्या दिवशी म्हणजे २९ मार्चला चित्रकूटच्या टूर वरून आम्ही येत होतो..आई अन् बाबा पण होते माझे या वेळी..खूप वर्षांनी येत होते माझ्याबरोबर..यायची खूप इच्छा असताना तब्येत साथ देत नव्हती म्हणून योग येत नव्हता..पण जमून आले अन् मला जास्त आनंद झाला..जसा श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन गेला..त्याप्रमाणे मला वाटले मी काशी नाही तरी..चित्रकूटला तरी घेऊन जाऊ. आजच्या काळातले हे चित्रकूट काशी पेक्षा कमी नाही..४ दिवसात..सगळे बघायचे ते बघितले..त्यांना पण त्रास झाला नाही..त्यांनी पण बऱ्याच दिवसांनी वेगळे ठिकाण बघितले..अन् ४ पर्यटक बरोबरीचे..त्यामुळे मी पण खूप आनंदात...
   अंजलीशी फोनवर सारखे बोलणे असायचे..दोन्ही मुलांना घेऊन एकटीने राहणे म्हणजे धाडसाचे होते..
नेहमी टूर वर असल्याने म्हणा..किंवा अजून पर्याय नसल्याने म्हणा तिला पण हळूहळू सवय झाली आहे..अतिशय सुंदरपणे पार्थ अन् समर्थला सांभाळते..
    २९ मार्चला ८.३० ला कल्याण स्टेशनला उतरलो, फोन आलाच.पार्थ होता..कधी येतो आहेस?? .म्हटले १० मिनिटामध्ये येतोच..मुलांना पण किती भेटण्याची आस असते ते जास्तच प्रकर्षाने जाणवले..नेमकी लोकल ट्रेन उशिरा आली..त्यामुळे येईपर्यंत ४० मिनिटे गेली..रिक्षामधून गल्लीमध्ये वळलो होतो..अन् त्याच वेळी..

   सोसायटीच्या आवारातून सगळे गडबडीने बाहेर पडत होते..पळत होते..मला वाटले कोणी चोर, काहीतरी घेऊन पळतो आहे..मी काही न बघता रिक्षा मधून उडी मारून बाहेर आलो..विचारले तर कळले..समर्थ घरात पडला होता..अन् अंजली त्याला घेऊन सुसाट डॉ.कडे न्यायचे म्हणून पळत होती..कॉर्नेरला पानवाला आहे तिथे दिसली..हातात निपचित पडलेला समर्थ..समोर डॉ. कडे नेले..त्यांनी सांगितले..हॉस्पिटलला न्या..
समोर काही दिसत नव्हते..रिक्षा थांबवली..सगळे ओळखीचे..त्यामुळे बरेच जण आमच्या मागोमाग हॉस्पिटल मध्ये..पण त्या ५-७ मिनिटामध्ये रिक्षामधल्या क्षणांमध्ये  माझे तोकडेपण जाणवले..कितीतरी प्रयत्न केले..समर्थ माझ्या हातात निपचित पडून..डोळे सताड उघडे..हात..पाय..चोळून झाले..हलवून थापट्या मारून..कृत्रिम श्वास देऊन सगळे झाले..अंजली इतका वेळ  सतत समर्थशी बोलण्याचा प्रयत्न करत होती..
आमची  दोघांची स्थिती सारखीच होती..पण समर्थ रडण्याचे चिन्ह नव्हते..तो पडल्यापासून रिक्षाने डॉ. कुलकर्णी च्या क्लिनिक ला पोचेपर्यंत १२ मिनिटे तरी झाली असतील ..खरे तर खूप जोरात वरून पण पडला नव्हता..पण घाबरला असावा..दादा ग्याल्लेरीत उभा वाट बघत त्याच्या मागे हा..तिथे पाट ठेवले होते..त्यांना पकडून उभे राहताना ..तो पाट अंगावर आला..अन् साहेब..आडवे..

रिक्षामधून घाईने उतरून ४ मजले पटापट धावत संपवले..तरी समर्थचे रडणेच  नव्हते..डॉ..आले लगेच..अन् त्याच वेळी तेव्हा कुठे थोडासा रडायचा आवाज आला..अन् आमच्या जीवात जीव..लगेच पल्स, हार्ट बीट मोजले..त्याचा एक्स रे काढायला सांगितला..२४ तास निरीक्षणासाठी ठेऊन घेतले..इतका वेळ असलेला ताण सैल होत गेला..अंजलीने तो रडण्याने कमी केला..तिला जास्त ताण, कारण आम्ही नसताना, कोणी नाही अशा वेळी एकटी पार्थला घरात एकटे सोडून पळत निघाली होती..योगायोगाने आम्ही पोचले म्हणून पार्थ जास्त वेळ एकटा नव्हता..आजी बरोबर तो घरी थांबला होता..त्याला फोन करून त्याचा भाऊ ठीक आहे म्हणून कळवले...एवढे एकून मगच तो शांतपणे झोपी गेला..
आम्ही रात्र जागूनच काढली..दर तासाने झोपला आहे नं..त्रास होत नाही नं...करत सकाळ कधी झाली कळले नाही..रात्री विचार करून करून डोके जास्तच दुखायला लागले..दुसऱ्या दिवशी १०.३० ला आम्ही समर्थला घेऊन सुखरूप घरी आलो..

हे एवढे सगळे का लिहिले?? दुसरा दिवस तर जागरण झाल्याने झोपण्यात गेला.. त्यानंतर मला २ दिवस चैन पडत नव्हते पण लिहून काढल्यास थोडे बरे वाटेल असे वाटले..आता लिहिले आहे..तर मग वाचा..अन् लहान मुलांच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या..हा सल्ला माझ्यासकट सगळ्यांसाठी ..

राहुल
९८१९०४२९५६
paarthrahul@yahoo.co.in

Tuesday, 19 July 2011

"घरकुल" भिन्नमती मुलांचे माहेर..

आपुलकी, आधार, जिव्हाळा
      या बाळांना देऊया,
'आम्ही  आहोत सदैव सोबत'
विश्वास यांना देऊया!!!
   या चार ओळीनी मतिमंदासाठी कार्यरत असलेल्या अमेय पालक संघटनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. कारण या चार ओळी त्यांच्या माहिती पत्रकावर जरी असल्या तरी..त्यांच्या बरोबरीने आपण सुद्धा त्यांचे कधीतरी पालक झालो तर आपला पण आनंद द्विगुणित होईल असे वाटते..
दोन  दशकापूर्वी कै. मेजर ग.कृ. काळे यांच्या प्रेरणेने घरकुलचे काम सुरु झाले..मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येऊन 'अमेय पालक संघटना' ही संस्था स्थापन केली.
मतिमंदत्व  हे अपंगत्व अन्य प्रकारापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचे आहे..अन्य अपंग शिक्षण, प्रशिक्षण वा सहाय् या  द्वारे पुष्कळसे स्वावलंबी होऊ शकतात. 'समजण' ही प्रक्रियाच मतिमंदांच्या बाबतीत होत नाही त्यामुळे पालकांना कायमच यांची काळजी घ्यावी लागते..
मी  बर्वेसर यांना फोन न करता निघालो..पण मला माहिती होते..ते तिथे असतीलच..त्यांची भेट झालीच ..त्यावेळी तरुण-तरुणींचा एक "सोल ग्रुप" तिथे आला होता..त्यांना माहिती सर देत होते..मलापण त्यात सामील करून घेताना सगळ्यांशी ओळख करून दिली..कशाप्रकारे काम सुरु असते..ते सांगितले..आज २४ मुले-मुली आहेत ते सगळे १८-५० वयोगटातील आहेत..आता अतिशय सुंदर वास्तू उभी राहिली आहे..शासनाच्या अनुदानाशिवाय हा प्रकल्प उभा आहे कारण सुजाण वा सहृदय हितचिंतक संस्थेस लाभले आहेत..
मी  त्या दिवशी गेलो असताना, श्री.संदेश जोशी यांचा वाढदिवस साजरा करणार होते..आम्ही सगळे जण पण त्यांच्या बरोबरीने वाढदिवस साजरा करायला थांबलो..खूप छान वाटले..खेळ झाले..गप्पा झाल्या..




डोंबिवली पासून ८-९ किमी.खोणी गावामध्ये हा प्रकल्प आहे..शाळा कॉलेजचे विध्यार्थी मुलांशी मैत्री करण्यासाठी येतात..जेष्ठ नागरिक आवर्जून भेट देतात..कंपन्या व विविध कर्मचाऱ्यांचे गट येतात..इकडच्या मुलांना पण आपण भेटलो की आनंद होतो..आपल्याला पण समाधान मिळते..आपले पण या  ठिकाणी स्वागत आहे.आपले वाढदिवस, आनंदाचे प्रसंग..या वेळी नक्की इकडे या..अधिक माहितीसाठी - कार्यवाह: अविनाश बर्वे ०२२-२५३३७२५०

धन्यवाद..
राहुल जोगळेकर
९८१९० ४२९५६