आपुलकी, आधार, जिव्हाळा
या बाळांना देऊया,
'आम्ही आहोत सदैव सोबत'
विश्वास यांना देऊया!!!
या चार ओळीनी मतिमंदासाठी कार्यरत असलेल्या अमेय पालक संघटनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. कारण या चार ओळी त्यांच्या माहिती पत्रकावर जरी असल्या तरी..त्यांच्या बरोबरीने आपण सुद्धा त्यांचे कधीतरी पालक झालो तर आपला पण आनंद द्विगुणित होईल असे वाटते..
दोन दशकापूर्वी कै. मेजर ग.कृ. काळे यांच्या प्रेरणेने घरकुलचे काम सुरु झाले..मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येऊन 'अमेय पालक संघटना' ही संस्था स्थापन केली.
मतिमंदत्व हे अपंगत्व अन्य प्रकारापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचे आहे..अन्य अपंग शिक्षण, प्रशिक्षण वा सहाय् या द्वारे पुष्कळसे स्वावलंबी होऊ शकतात. 'समजण' ही प्रक्रियाच मतिमंदांच्या बाबतीत होत नाही त्यामुळे पालकांना कायमच यांची काळजी घ्यावी लागते..
मी बर्वेसर यांना फोन न करता निघालो..पण मला माहिती होते..ते तिथे असतीलच..त्यांची भेट झालीच ..त्यावेळी तरुण-तरुणींचा एक "सोल ग्रुप" तिथे आला होता..त्यांना माहिती सर देत होते..मलापण त्यात सामील करून घेताना सगळ्यांशी ओळख करून दिली..कशाप्रकारे काम सुरु असते..ते सांगितले..आज २४ मुले-मुली आहेत ते सगळे १८-५० वयोगटातील आहेत..आता अतिशय सुंदर वास्तू उभी राहिली आहे..शासनाच्या अनुदानाशिवाय हा प्रकल्प उभा आहे कारण सुजाण वा सहृदय हितचिंतक संस्थेस लाभले आहेत..
मी त्या दिवशी गेलो असताना, श्री.संदेश जोशी यांचा वाढदिवस साजरा करणार होते..आम्ही सगळे जण पण त्यांच्या बरोबरीने वाढदिवस साजरा करायला थांबलो..खूप छान वाटले..खेळ झाले..गप्पा झाल्या..
डोंबिवली पासून ८-९ किमी.खोणी गावामध्ये हा प्रकल्प आहे..शाळा कॉलेजचे विध्यार्थी मुलांशी मैत्री करण्यासाठी येतात..जेष्ठ नागरिक आवर्जून भेट देतात..कंपन्या व विविध कर्मचाऱ्यांचे गट येतात..इकडच्या मुलांना पण आपण भेटलो की आनंद होतो..आपल्याला पण समाधान मिळते..आपले पण या ठिकाणी स्वागत आहे.आपले वाढदिवस, आनंदाचे प्रसंग..या वेळी नक्की इकडे या..अधिक माहितीसाठी - कार्यवाह: अविनाश बर्वे ०२२-२५३३७२५०
धन्यवाद..
राहुल जोगळेकर
९८१९० ४२९५६

No comments:
Post a Comment